Ad will apear here
Next
‘मॅच फिक्सिंग’चा पर्दाफाश...
क्रिकेट या खेळाला कोणे एके काळी ‘सभ्य गृहस्थांचा खेळ’ म्हटलं जाई; पण गेल्या काही दशकांत ती परिस्थिती झपाट्याने बदलली आणि ‘मॅच फिक्सिंग’चा सुळसुळाट झाला. दक्षिण आफ्रिका, भारत, पाकिस्तान, बांगलादेश अशा देशांचे खेळाडू संशयाच्या भोवऱ्यात सापडले. काही जणांवर गुन्हे सिद्ध झाले. या मॅच फिक्सिंगची नेमकी कहाणी शंतनू गुहा राय यांच्या मूळ इंग्लिश पुस्तकाच्या मुकेश माचकर यांनी मराठीत अनुवाद केलेल्या पुस्तकातून कळते आणि क्रिकेटवरचा विश्वासच उडतो.... या पुस्तकाचा परिचय...
..............
जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणून गेला होता, ‘क्रिकेट इज ए गेम प्लेड बाय इलेव्हन फूल्स अँड वॉच्ड बाय इलेव्हन थाउजंड फूल्स.’ आता मात्र परिस्थिती बघता हा गेम खेळणारे ‘फूल्स’ नसून भलतेच चतुर आहेत आणि बघणारे अब्जावधी मात्र पूर्वीपेक्षा साधे फूल्स म्हणजे मूर्खच नव्हे तर भाबडे आणि बावळट मूर्ख आहेत असंच म्हणावं लागेल. कारण महागडी तिकिटं काढून स्टेडियममध्ये घामाघूम होत किंवा कामाला दांडी मारून टीव्हीसमोर दिवसभर फतकल मारून बसून भक्तिभावाने मॅचेस बघणाऱ्यांच्या बुद्धीची कीव करावी, अशीच परिस्थिती गेल्या काही वर्षांत समोर आलेल्या मॅच फिक्सिंगच्या एकाहून एक सुरस आणि अद्भुत कहाण्यांनी निर्माण केली आहे. आणि अशा अनेक कहाण्यांपैकी काही महत्त्वाच्या आणि गाजलेल्या केसेस शंतनू गुहा राय यांनी ‘फिक्स्ड’ या त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि सखोल माहिती देणाऱ्या पुस्तकातून मांडल्या आहेत.

...पण क्रिकेटला हा रोग तसा नवा नाही. कारण फार फार वर्षांपूर्वी मुश्ताक अली हयात असताना त्यांनीच ‘मुंबई मिड-डे’च्या रविवारच्या आवृत्तीत एक किस्सा सांगितला होता की त्यांच्या काळात त्यांची आणि विजय मर्चंट यांची छान ओपनिंग पार्टनरशिप जमायची. तेव्हाही एका महाभागाने त्यांना काही पैशांची ऑफर दिली होती – ‘विजय मर्चंटची सेंच्युरी होऊ न देण्यासाठी धावबाद करावं म्हणून!’...अर्थात त्या काळी पैशांसाठी असले घाणेरडे उद्योग चालत नसल्याने त्यांनी ते केलं नाही हे अलाहिदा! पण गेल्या काही वर्षांमधल्या बदलत्या जमान्यात क्रिकेट या एके काळच्या ‘सभ्य गृहस्थांच्या खेळा’ला पैशांच्या हव्यासापायी बट्टा लागत गेला त्यात नवल नव्हतं. या पार्श्वभूमीवर शंतनू गुहा राय यांचं ‘फिक्स्ड’ हे पुस्तक भरपूर माहिती देतं.

शंतनू गुहा राय यांनी त्यांच्या अभ्यासातून बाहेर आणलेली माहिती सामान्य क्रिकेटप्रेमी भारतीयाला खडबडून जागं करणारी आहे. त्यांनी लिहिलंय, की क्रिकेट बुकीजचं नेटवर्क जगभर खोल पसरलेलं आहे. एखाद्या जेट इंजिनाच्या सुविहित चालणाऱ्या सिम्युलेशन सिस्टीमप्रमाणे ही यंत्रणा चालते. सर्व ठिकाणी पुरेसा बॅकअप उपलब्ध असतो. तोंडी उच्चारलेला शब्द प्रमाण असतो आणि काही सेकंदांत रोख रक्कम पोहोचवली जाते. यांच्या वर असतात ते एखाद्या शहरात किंवा राज्याच्या वेगवेगळ्या भागांत कार्यरत असलेल्या बुकींच्या गटांचं व्यवस्थापन करणारे लोक. भारतात देशाचे पाच भाग पडतात. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि मध्य भारत. या पाच भागांचे आणखी छोटे विभाग पडतात. १० मिनिझोन्स आणि ३० सबझोन्स. या विभागांचं नेतृत्व ज्यांच्याकडे असतं, त्यांना या साखळीत वर असणाऱ्या माणसांकडून कोणावर किती पैसे लागले आहेत याची माहिती मिळते. कागदावर अस्तित्वात नसलेला हा उद्योग अशा प्रकारे रचलेला असतो की तळाला साखळीत काम करणाऱ्या बुकींना त्यांच्या साखळीत त्यांच्याच डोक्यावर असलेल्या माणसाचीही ओळख नसते. भारतीय बुकी पोलिसांना गंडवण्यासाठी अत्यंत आलिशान ठिकाणं वापरतात. काही सॅटेलाइट फोन घेऊन गावांमधून कारभार चालवतात, काही पोलिसांना लाच देऊन स्टेडियमजवळच्या हॉटेलांमध्ये किंवा ग्राहकांची वर्दळ कमी असलेल्या वरच्या मजल्यांवर दुकाने थाटतात. मुंबईत तर उघडकीस आलेल्या दोन प्रकरणांमध्ये बुकींनी आयपीएल २०१४च्या पर्वाच्या आधी ‘शहरातल्या बांधकाम व्यवसायला असणाऱ्या समस्या’ अशा विषयांवर कॉन्फरन्स आयोजित केल्याचा देखावा केला. बाहेर मारे पोलीस पहारा देत होते आणि आत जमलेली मंडळी बांधकाम व्यावसायिकांच्या समस्या नव्हे, तर बेकायदा रोख रक्कम किती द्यायची आणि कोणकोणते संघ आणि खेळाडू फिक्स करायचे त्यावर चर्चा करत होते!... गुहा यांनी १९९८ सालचा अझरुद्दीनचा दुबई हॉटेलचा किस्साही दिला आहे. दाउद इब्राहिम तिथे काही मित्रांबरोबर आला. काही सेकंदांत अझरुद्दीन तिथे आला. त्यांच्यात काही औपचारिक गप्पा झाल्यावर त्याने त्यांच्याकडून एक पाकीट घेतलं आणि तो निघून गेला. पुढे अझरुद्दीनवर आजीवन बंदी घातली गेली. 

पाकिस्तान संघाच्या मॅच फिक्सिंगविषयी घडलेला किस्सा आणि त्यांचे प्रशिक्षक बॉब वूल्मर यांचा गळा आवळून करण्यात आलेला खून हे प्रकरणसुद्धा धक्कादायक आणि वाचताना आपण थक्क होतो. 

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हॅन्सी क्रोनिएने तर १९९६ ते २००० या काळात वेगवेगळ्या बुकीजकडून तब्बल एक लाख ४० हजार पौंड स्वीकारल्याची कबुली त्याच्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या किंग आयोगासमोर दिली होती. क्रोनिएने कसं कसं फिक्सिंग केलं त्याचीही तपशीलवार माहिती पुस्तकात आहे. पुढे त्याचा विमान अपघातात मृत्यू झाला. तो निश्चितच संशयास्पद होता आणि त्यामागे घातपातच होता, त्याचं तोंड बंद करण्यासाठी असं केलं गेल्याचं बोललं गेलं.

तीन नोव्हेंबर २०११ रोजी लंडनमध्ये पाकिस्तान क्रिकेटची लाज निघाली होती. तेव्हा सलमान बट्ट, मोहम्मद आमीर आणि मोहम्मद असिफ या तिघांना ७७ हजार ५०० पौंडांपेक्षा अधिक रकमेसाठी मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यांना फिक्सिंगसाठी तयार करणारा माजिद हा भारतीय बुकीजच्या संपर्कात होता. तिघा खेळाडूंवर पाच ते दहा वर्षांची बंदी घालण्यात आली होती. 

तशीच कहाणी बांगलादेशच्या खेळाडूंची. आयपीएल, ललित मोदी, शशी थरूर यांचीही कहाणी वाचण्यासारखी आहे. निओ स्पोर्टस्, बीसीसीआय, जगमोहन दालमिया, राज कुंद्रा, मय्यप्पन आणि विंदू दारासिंग वगैरेंच्या केसेसही चक्रावून टाकणाऱ्याच आहेत.

२०१० साली धर्मेश शर्मा या भारतीय न्यायाधीशांनी एका निकालादरम्यान केलेल्या टिप्पणीने सर्वांना हादरवून सोडलं होतं. ते म्हणाले होते, ‘क्रिकेटमधल्या बेटिंगने आता अक्राळविक्राळ स्वरूप धारण केलंय. यातून निर्माण होणारा पैसा अमली पदार्थांची वाहतूक आणि दहशतवादी कारवायांसारख्या अभद्र गोष्टींकडे वळवला जात असल्याचं समोर आलं आहे...’

हे पुस्तक वाचून सामान्य क्रिकेटप्रेमी खडबडून जागं होईल आणि यापुढे क्रिकेटमधल्या लढती खरोखरीच्या आहेत की लुटूपुटुच्या? मॅचेस नैसर्गिक होताहेत की फिक्स केल्या गेल्याहेत, ही शंका नक्कीच मनात येत राहील... आणि ती फारशी चुकीचीही नसेल... क्रिकेटप्रेमींनी नक्कीच वाचावं असं हे पुस्तक आहे.
 
मुकेश माचकर यांनी केलेला या पुस्तकाचा मराठी अनुवाद शीर्षकापासूनच आपली पकड घेतो. मूळ पुस्तकाचं नाव ‘फिक्स्ड! कॅश अँड करप्शन इन क्रिकेट’ असं असताना माचकर यांनी ‘मॅच फिक्सिंगचा पर्दाफाश’ असं सनसनाटी नाव दिल्याने सामान्य वाचकाला काहीतरी खळबळजनक पोलखोल वाचायला मिळणार याची उत्सुकता पहिल्या पानापासूनच राहते. माचकरांनी केलेला अनुवाद उत्तम जमून आल्यामुळे पुस्तकातली उत्कंठा कायम राहून वाचक गुंगून जातो आणि एका बैठकीतच पुस्तकाचा फन्ना पडतो, हे अनुवादाचं यश निश्चित मानता येईल.  

पुस्तक : फिक्स्ड... मॅच फिक्सिंगचा पर्दाफाश!
लेखक : शंतनू गुहा राय 
अनुवादक : मुकेश माचकर   
प्रकाशक : मुग्ध कोपर्डेकर, इंद्रायणी साहित्य, शनिवार पेठ, पुणे-३०  
संपर्क : (०२०) २४४५८५९८  
पृष्ठे : २०८ 
मूल्य : २०० ₹ 

(‘फिक्स्ड... मॅच फिक्सिंगचा पर्दाफाश!’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZLZBM
Similar Posts
विश्वगामिनी सरिता! कधी ‘कॅसाब्लांका’मुळे गाजलेल्या मोरोक्को आणि सहारासकट नामिबिया-साउथ आफ्रिकेला भेट, तर कधी बाल्कनसकट संपूर्ण युरोप, कधी हक्काची संपूर्ण अमेरिका आणि कधी गोबीवाला मंगोलिया, तर कधी गलापगस बेटांवर, कधी न्यूझीलंडमुक्कामी आणि कधी तर थेट रक्त गोठवणाऱ्या बर्फाळ थंडीच्या अंटार्क्टिकावर... अशी पृथ्वीच्या पाठीवरची
खिळवून ठेवणारी त्रि-सिनेधारा ‘मस्ट सी’ कॅटेगरीत आज दुसरी फिल्म, नव्हे खरं तर तीन फिल्म्स एकत्र! कारण एकाच कथेत या तीन फिल्म्स गुंतल्या आहेत. खरं पाहता तिन्ही फिल्म्स एकमेकांशिवाय अपूर्ण; कारण कथा आणि कथेतल्या पात्रांना वेगवेगळ्या काळांत जाऊन भेटल्याशिवाय आणि काही गोष्टी ‘घडवून आणल्याशिवाय’ कथा अपूर्ण! गोंधळलात ऐकताना? मग त्यासाठी
‘सकारात्मकतेकडे पाहायला हवे’ ‘माध्यमं आणि सोशल मीडियात नकारात्मकतेचं प्रमाण अधिक असलं, तरी आपल्याला भेटणारी बहुतांश माणसं आणि येणारे अनेक अनुभव सकारात्मकच असतात. नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करून आपण त्यावर लक्ष केंद्रित करायला हवं,’ असं सुप्रसिद्ध पत्रकार, लेखिका, प्रवासवर्णनकार आणि स्थापत्यशास्त्राच्या अभ्यासक शेफाली वैद्य यांना वाटतं
आठवणींच्या सरींनी भिजवणारा मल्हार मल्हार राग मोठा विलक्षण! गायला सुरुवात केली, की सुखद सरींची बरसात सुरू! तसाच काहीसा आपल्या प्रत्येकाच्या मनाच्या तळाशी एक मल्हार दडलेला असतो. त्याची नुसती याद जागवली, तरी आठवणींच्या सरींनी तो चिंब करतो आपल्या मनाला... शरीराला... आणि मग ती धुंदी... ती तंद्री न संपू नये अशी! चंद्रशेखर टिळक यांचं ‘मल्हार

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language